Induction Program-2026 for Diploma First Year Students
[wpseo_breadcrumb]
विश्वभारती अकॅडमीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न
नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत; शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाची दिली दिशा
सारोळा बद्धी : नव्या स्वप्नांसह आणि उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रनिकेतन शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करत विश्वभारती अकॅडमीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सारोळा बद्धी येथे दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी पॉलिटेक्निक नवोदित विद्यार्थी स्वागत व परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला नवोदित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, तांत्रिक शिक्षणाची दिशा, शैक्षणिक शिस्त, विविध उपक्रम तसेच त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी उपलब्ध असलेल्या विविध संर्धीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व संस्थेच्या ट्रस्टी शिवाली पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन जीवनातील शैक्षणिक वाटचालीसोबतच कौशल्यविकास, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, नेतृत्वगुण आणि विविध उपक्रमांमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपली वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. कॅम्पस डीन प्रा. आर. डी. साखरवाडे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक कार्यपद्धती, विविध विभाग, परीक्षा प्रक्रिया, ग्रंथालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध सुविधांची माहिती दिली.
कॅम्पस डायरेक्टर प्रा. व्ही. व्ही. नवले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा पुरेपूर उपयोग करून शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढगे एस. ए. यांनी केले.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत राऊत, सई जोशी आणि श्रेयस डफळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत इंडक्शन कार्यक्रमातील अनुभव सांगितले. महाविद्यालयीन वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक संधींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देतानाच त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील संधी, जबाबदाऱ्या आणि विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. नव्या वातावरणात आत्मविश्वासाने पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित पालकांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी जान्हवी अवस्थी, ट्रस्टी श्री. इशान पाटणकर, तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. दळवी ए. एस. यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. नवोदित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.







